
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तात्काळ दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना मदत करा,संपूर्ण कर्जमाफी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.सध्या संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात,विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अत्यंत गंभीर व चिंताजनक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे हाताशी आलेली पिके पूर्णपणे करपून गेली असून,पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.शासनाने पहिल्या टप्प्यात काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला, तरी वस्तुस्थिती पाहता जिल्ह्यातील उर्वरित अनेक तालुके व महसूल मंडळात भीषण परिस्थिती असतानाही ते दुष्काळ जाहीर होण्यापासून वंचित राहिले आहेत. गतवर्षीही ओल्या दुष्काळाच्या काळात शासनाने मोठ्या घोषणा केल्या,परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती कोणतीही भरीव मदत किंवा पीक विमा पोहोचला नाही.त्यामुळे शासन दुष्काळाबाबत गंभीर नाही, असाच रोष बळीराजाच्या मनात निर्माण झाला आहे.
सध्याच्या भीषण परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून, त्याला तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे. यास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना छत्रपती संभाजीनगर एकच्या वतीने आम्ही आपणाकडे खालील प्रमुख मागण्या करत आहोत:प्रमुख मागण्या :
संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करा,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुके व महसूल मंडळात तात्काळ पूर्ण दुष्काळ जाहीर करण्यात यावा. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करा ,बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटी व शर्ती न लावता हेक्टरी भरीव आर्थिक मदत थेट खात्यावर जमा करण्यात यावी.संपूर्ण कर्जमाफी चालू बाकीदार व थकबाकीदार असा कोणताही भेद न करता सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.पीक विमा भरपाईः सर्व बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई तात्काळ व विनाअट मंजूर करून तिचे वितरण करण्यात यावे. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी: ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर,
जनावरांसाठी छावण्या,चारा डेपो आणि रोहयो (EGS)अंतर्गत कामांची तात्काळ सुरुवात करण्यात यावी.शेतकऱ्यांची वीज वसुली स्थगिती: दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतीची वीज जोडणी,खंडित करणे थांबवावे व सर्व प्रकारची महसूल वसुली तात्काळ स्थगित करावी.
जर शासनाने व प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले,तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन-सुविधा व आस्थापना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रोज एका तालुक्यात तहसील कार्यालयावर घंटा बजाव, ढोल बजाव, डफड बजाव, हलगी बजाव व शिट्टी बजाव तसेच शंखनाद करून झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभं करेल आणि जोपर्यंत प्रत्येक
शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी असे जिल्हा संघटक अशोक पवार पाटील यांनी निवेदनात कळवले.निवेदनावर अशोक पवार,अशोक कराळे,बाळासाहेब बोजवारे, मौलाना गफूर पटेल, विठ्ठल बनकर ,राजू बनकर, मुकेश मालोदे ,भागिनाथ मालोदे, लहू गायकवाड , कडुबा सोनवणे,जालिंदर गायकवाड, ओम जिते,रुपेश शिंदे, रवींद्र गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.