गंगापूर नगर परिषदेच्या वतीने सुंदर आणि आदर्श शहरासाठी प्रयत्न,सहा महिन्यांत विकासाचा पाया मजबूत:नगराध्यक्ष संजय जाधव

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय जाधव यांनी आपल्या सहा महिन्यांच्या कार्यकाळातील विकासकामांचा लेखाजोखा मांडत शहरातील पाणीपुरवठा,स्वच्छता,पथदिवे आणि विविध विकासकामांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचा दावा केला.पत्रकार परिषदेत त्यांनी गेल्या सहा महिन्यांत पूर्ण झालेल्या कामांची माहिती दिली. निवडणुकी दरम्यान नागरिकांना दिलेल्या मूलभूत सुविधांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जॅकवेल, मोटारींची दुरुस्ती आणि क्षमता वाढविण्याचे काम करण्यात आले.तसेच कायगाव येथील उपसा जलसिंचन विहिरीतून स्वतंत्र पाईपलाईन टाकून शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून बंद असलेले जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्यात आले असून शहरवासीयांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन पाणीपुरवठा योजनेचाही प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासंदर्भातील बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे होणार आहे.शहरातील मुख्य रस्त्यांवरील बंद पथदिव्यांची दुरुस्ती करून नवीन पथदिवे बसविण्यात आले आहेत. तसेच प्रमुख चौकांमध्ये हायमास्ट दिवे उभारल्याने शहर अधिक सुरक्षित व प्रकाशमान झाले असल्याचा दावा करण्यात आला. स्वच्छतेला प्राधान्य देत नाल्यांची साफसफाई, कचरा संकलन व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याचे काम करण्यात आले आहे.शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेली भूमिगत गटार योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून ती लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय हरित गंगापूर अभियानांतर्गत रस्त्यांच्या दुभाजकांवर वृक्षारोपण आणि उद्यानांचे सुशोभीकरण सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.थोड्याच दिवसात बाजारतळ,छत्रपती शिवाजी महाराज चौक व जास्त रहदारीच्या ठिकाणी स्वच्छतागृहची व्यवस्था करण्यात येणार आहे.विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समिती आणि केंद्र-राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचा दावा करत आगामी काळात शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष जाधव यांनी स्पष्ट केले.यावेळी उपनगराध्यक्ष अमोल दादा जगताप तसेच नगरसेवक योगेश पाटील, संतोष आंबीलवादे, राकेश कळसकर, फैसल चाऊस, आनंद पाटील, सय्यद अख्तर,आबासाहेब शिरसाट,विशाल गायकवाड आणि नवनाथ कानडे,समाज सेवक राहुल वानखडे उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button