
गंगापूर प्रतिनिधी: न्यायालयाच्या तारखेला वारंवार गैरहजर राहणाऱ्या व कायद्याला आव्हान देणाऱ्या वॉरंट धारकांविरुद्ध गंगापूर पोलिसांनी भल्या पहाटे धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली.पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ३५ न्यायालयीन वॉरंटधारकांपैकी तब्बल २७आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले.गंगापूर तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथील
न्यायालयांमध्ये विविध गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी संबंधित आरोपींना वारंवार हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, न्यायालयीनआदेशांकडे दुर्लक्ष करून हे आरोपी गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले होते.या वॉरंटची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील,पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने पहाटेपासूनच विविध ठिकाणी छापेमारी करत आरोपींचा शोध घेत
त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, उर्वरित ८वॉरंटधारकांचा शोध अद्याप सुरू आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल झांजुर्णे, युसुफ पठाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमितपाटील, रमेश जारवाल, विजय पारखे, गोपनीय शाखेचे मनोज नवले,मनोज घोडके, पोलीस नाईक विठ्ठल जाधव तसेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप घुसंगे, अनिरुद्ध शिंदे, अमोल करवंदे, नारायण दुल्हन, विष्णू
बापते, अश्विनी गायकवाड आणि रेणुका धारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.