गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील सेंट मेरी विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षाची दणक्यात सुरुवात; विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत, पदाधिकाऱ्यांचा सत्कार,बस पासचे वितरण

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील सेंट मेरी विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात संपन्न झाली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेंट मेरी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साह, जल्लोष आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वागत, नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि बस पास वितरण अशा विविध उपक्रमांनी शाळेच्या पहिल्या दिवसाला विशेष रंगत प्राप्त झाली.शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात, टाळ्यांच्या कडकडाटात आणि आनंदमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.तसेच पुस्तके,चॉकलेट वाटप करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर मित्रमंडळी आणि शिक्षकांना भेटल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संपूर्ण शाळा परिसर उत्साहाने फुलून गेला होता.यावेळी संस्थेचे सचिव रा.रे.फादर संजय रुपेकर, फादर मायकल अँथनी, फादर विनोद शेळके, प्राचार्य संजय बनसोडे, नवनियुक्त उपप्राचार्य अजय थोरात, नवनियुक्त पर्यवेक्षक विराळे सर, मुख्याध्यापक गोरख पारखे सर तसेच गंगापूर आगाराचे आगार प्रमुख विजय बोरसे सर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक भापकर सर, वाहतूक नियंत्रक व्ही. टी. बोडके, कामगार आघाडीचे अध्यक्ष दिलीप मनाळ तसेच साईनाथ भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमादरम्यान अजय थोरात यांची उपप्राचार्यपदी तर विराळे सर यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून गंगापूर आगाराच्या वतीने बस पासचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून देत नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. स्वागत, सत्कार आणि विद्यार्थी हिताच्या उपक्रमांनी सेंट मेरी विद्यालयाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करत शिक्षण क्षेत्रातील आपली वेगळी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हेच या कार्यक्रमाचे खरे यश ठरले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button