
प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज होणार माफ.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या निर्णयालाही मंजुरी देण्यात आली आहे.यासाठी ३६ हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकरी कर्जमाफीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. पण निवडणूक आयोगाने घातलेल्या अटीमुळे आज आम्ही कर्जमाफीची अधिकृत घोषणा करु शकत नाही,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी बोलताना स्पष्ट केले होते.
“कर्जमाफीचा आजच निर्णय, पण घोषणा नाही”- मुख्यमंत्री
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंर्थसंकल्पातून केली होती. या योजनेनुसार, पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.
“कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक”
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली होती. शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करणे तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करुन त्याबाबतचा अहवाल या समितीने शासनास सादर केला होता.